अकोला : आंतरजिल्हा बदलीने नियमबाह्यपणे रुजू झालेल्या १३२ शिक्षकांना तीन दिवसांत कार्यमुक्त केले जाईल, तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी २०११ पासून देण्यात आलेले सर्व ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत १५ मेपर्यंत अहवाल सादर केला जाईल, असे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत मंगळवारी सांगितले. सभापती पुंडलिकराव अरबट यांनी शिक्षण विभागातील अनेक नियमबाह्य बाबी बैठकीत उपस्थित केल्या. त्यावर दिग्रसकर यांनी ही माहिती दिली. आयुक्तांच्या चौकशी अहवालानुसार १३२ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली नियमबाह्यपणे झाली. त्यांना कार्यमुक्त करा, जातवैधता नसलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा, आंतरजिल्हा बदलीसाठी देण्यात आलेले ४७ ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करा, शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव तीन दिवसांत निकाली काढा, वैद्यकीय देयके तातडीने मंजूर करा, त्याचा अहवाल उद्या बुधवारपर्यंत देण्याचेही सभापती अरबट यांनी सभेत सांगितले. नवे वर्ग निर्मितीची दक्षता घ्या!जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू होण्याची दक्षता संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी, तसेच वर्ग सुरू झाल्याबाबतची शहानिशा करण्याचेही निर्देश सभेत देण्यात आले. मोरगाव (भाकरे), उरळ येथील गैरहजर शिक्षकांवर कारवाई न झाल्याचे बैठकीत पुढे आले. प्रस्तावांचे काय झाले...विद्यार्थ्यांना बुट, टाय, सॉक्स, बेल्ट, ओळखपत्र, सीसी कॅमेरा, वॉटर प्युरिफायर पुरवठ्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अद्याप मागणी आली नाही. सोबतच आवारभिंत बांधकाम, शाळा दुरुस्तीची कामे, शौचालय बांधकामाचे प्रस्तावही आले नाहीत. ते तातडीने सादर करण्याचेही बैठकीत सांगण्यात आले. शालेय पोषण आहारप्रकरणी कारवाईचे काय..जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद होता. त्यामध्ये वांगरगाव, धोत्रा, बोरगाव मंजू उर्दू, तळेगाव खुर्द, धारेल येथील मुख्याध्यापकांवर कारवाईचे काय झाले, तसेच अकोट पंचायत समिती अंतर्गतही हा प्रकार घडला होता. त्यावरही कारवाई न झाल्याने सभापती अरबट यांनी नाराजी व्यक्त केली.
तीन दिवसांत शिक्षक कार्यमुक्त, ४७ ‘एनओसी’ रद्द होणार!
By admin | Published: May 03, 2017 1:21 AM