अकोला : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने धरणांची पातळी आता कमालीची खालावली असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२ कोटी लिटर म्हणजे दोन ते तीन दिवसांचाच जलसाठा शिल्लक आहे. दमदार पाऊस न आल्यास मात्र धरणातील मृत जलसाठा उपसावा लागणार आहे. मागीलवर्षी या भागात कमी पाऊस झाल्याने धरणाच्या जलपातळीत वाढ झाली नव्हती. परिणामी, यावर्षी पाण्याचे वितरण तोलून मापून करावे लागले. यावर्षी पाऊस चांगला व दमदार होणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तविल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या; परंतु पावसाळ्य़ाचे तीन आठवडे संपले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरक पाऊस झाला नाही. परिणामी, धरणाची जलपातळी तळाला पोहोचली आहे. यावर्षी तापमान जास्त होते परिणामी बाष्पीभवनाचे प्रमाणही अधिक होते. काटेपूर्णा धरणात सध्या १२ कोटी लिटर पाणी शिल्लक आहे. अकोला शहराला झोननिहाय दररोज साडेपाच कोटी लिटर पाणी सोडण्यात येत आहे. या परिस्थितीप्रमाणे पाणी सोडल्यास हे शिल्लक पाणी केवळ दोन ते तीन दिवसच शहराला पुरेल, अशी स्थिती आहे. पाण्याचा होणारा अपव्यय, जलवाहिन्यांची गळती आदींची गोळाबेरीज केली, तर काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठा दोन दिवस पुरेल, असे सांगत असले तरी कधी संपेल हे सांगता येत नाही. परिणामी मृत जलसाठय़ावरच अकोलेकरांची तहान भागवावी लागेल. मृत जलसाठा ११00 कोटी लिटर आहे. पण, धरणात पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक गाळ असल्याने ५00 कोटी लिटरपर्यंत या धरणात मृत साठा असेल. संपूर्ण ५00 कोटी मृत जलसाठा उचलणे अशक्य असल्याने यातील दोनशे ते अडीचशे कोटी लिटर पाणी वापरता येईल.
‘काटेपूर्णा’त तीन दिवसांचा जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2016 1:45 AM