अकोला: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती विभागातील कार्यालयीन वादग्रस्त ठरणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना केवळ निलंबितच करण्यात आले नाही, तर त्यांची बदली थेट रत्नागिरीकडे करण्यात आली आहे. अमरावती एमआयडीसी विभागाचे अधिकारी सुधाकर फुके यांनी हा आदेश काढला आहे.निलंबित आणि शिक्षा झालेल्या कर्मचाºयांमध्ये अकोला एमआयडीसी क्षेत्रीय कार्यालयातील अविनाश चंदन यांचा समावेश आहे. अमरावती येथील पुरुषोत्तम पेटकर आणि ढोके यांचा समावेश आहे. अमरावती येथील कार्यालयीन घोळाची चौकशीदेखील या तिघांची लागली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एमआयडीसीतील प्लॉट विक्रीच्या कार्यालयीन प्रक्रियेत घोळ करण्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला असून, त्याची चौकशी होईस्तोवर त्यांना अमरावती विभागात प्रवेश नसणार आहे, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. अकोल्यात आधीच कमी मनुष्यबळ असल्याने आता केवळ दोन कर्मचारी अकोला कार्यालयात आहेत. अकोला एमआयडीसी क्षेत्रीय अधिकारी पदाचा प्रभार यवतमाळ येथील रामचंद्र गायकी यांच्याकडे सोपविले आहे. आठ दिवसांतून दोन दिवस ते अकोल्यात येत असल्याने अकोल्यातील उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.