अडगाव बु. : समाजकल्याण विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड महिला सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यात अडगाव बु. येथील तीन महिलांना ६ जून रोजी बागायती शेतीचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांना, आपल्या नावाने सात-बारा होईल, जमीन मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. असे म्हणत, लाभार्थी महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
समाजकल्याण विभागाच्यावतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरिता अडगाव बु. शेतशिवारात साडेपाच एकर बागायती शेती खरेदी करून जिल्हास्तरीय निवड समितीने निवड प्रक्रिया राबवून ईश्वर चिठ्ठीद्वारे तीन लाभार्थ्यांची निवड केली. त्यात एक परित्यक्ता व दोन विधवांचा समावेश आहे. परित्यक्ता भिमकन्या वसंत धाबे ०.८० आर, विधवा मंगला संतोष अंभोरे ०.८० आर व चंद्रकला भाऊराव सावळे ०.६० आर अशी शेतजमीन वाटप करण्यात आली.
ईश्वर चिठ्ठीने निवड झालेल्या लाभार्थींना सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक सुसतकर, समाजकल्याण निरीक्षक उमा जोशी, कनिष्ठ लिपिक पराते, लांडगे यांच्याहस्ते आदेशाची प्रत देण्यात आली. समाजकल्याण विभागाच्यावतीने लाभार्थी महिलांना सदर शेतीची रितसर मोजणी करून त्यांना शेतीचा ताबा देण्यात आला.
यावेळी माजी सभापती गोपाल कोल्हे, मंगलसिंग डाबेराव, माजी उपसरपंच महेबुखॉ पठाण, मंडल अधिकारी नंदकिशोर पवार, पोलीस पाटील हितेश हागे, सामाजिक कार्यकर्ते महादेव सावळे उपस्थित होते.
फोटो:
ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे मिळाला लाभ
ग्रामपंचायतीने पाठविलेला प्रस्ताव व केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला लाभ मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली. आम्ही शेतीचे मालक होऊ. आपल्या नावाने सात-बारा होईल, याचा कधी विचार केला नव्हता. परंतु शासनाच्या समाजकल्याण विभागातील योजनेमुळे आमचे आयुष्यच बदलून गेले, अशी भावना लाभार्थी भिमकन्या वसंत धाबे, मंगला संतोष अंभोरे, चंद्रकला भाऊराव सावळे यांनी व्यक्त केली.
अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्न स्त्रोत उपलब्ध होऊन त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता १०० टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत लाभ दिला जात आहे.
- उमा जोशी, समाजकल्याण निरीक्षक