अकोला: लहान उमरी येथील एक दाम्पत्य गुरुवारी पहाटे शेगाव येथे दर्शनासाठी गेल्यानंतर परत येत असताना त्यांचा १0 वर्षीय मुलगा रेल्वेतून बेपत्ता झाला होता. या प्रकाराची माहिती ऑपरेशन मुस्कानमध्ये कार्य करीत असलेल्या तीन पोलिसांना मिळताच त्यांनी मुलाचा तीन तासात शोध घेऊन त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. ऑपरेशन मुस्कानचे हे चांगले यश असल्याची प्रतिक्रिया मुलाच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. लहान उमरी येथील रहिवासी शंकर पारधी हे त्यांची पत्नी व मुलगा मयूर ऊर्फ यश याच्यासोबत गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या पॅसेंजरने शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते अकोला येथे परतीसाठी रेल्वेने निघाले. रेल्वेमध्ये गर्दी असल्याने त्यांनी मुलाला एका बर्थवर झोपविले. अकोला आल्यानंतर त्यांनी मुलाचा शोध घेतला असता मुलगा दिसला नाही. दोघेही रेल्वेतून अकोला रेल्वे स्थानकावर उतरले. मुलाचा शोध सुरू केला; मात्र मुलगा दिसत नसल्याने दोघांच्याही हृदयाची कालवा-कालव सुरू झाली. मुलगा दिसत नसल्याने पारधी यांच्या पत्नीला कसेबसे झाले. या प्रकाराची माहिती ऑपरेशन मुस्कानमध्ये कार्य करीत असलेले पोलीस कर्मचारी गजानन बांगरे, अनिल खरेकर व अमित दुबे यांना मिळाली. त्यांनी रेल्वे स्टेशन गाठून मुलाचा शोध सुरू केला. त्यानंतर रेल्वेच्या मागेच ते मूर्तिजापूर येथे दाखल झाले. मूर्तिजापूर स्टेशनवर चौकशी केल्यानंतर त्यांना सदर मुलासदंर्भात माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मूर्तिजापूर शहरात मुलाचा शोध घेतला असता त्यांना तहसील रोडवरील एका बँकेनजीक सुरू असलेल्या बांधकामावर मुलगा बसलेला दिसला. या मुलाची चौकशी केल्यानंतर तो पारधी यांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. ऑपरेशन मुस्कानच्या पथकाने वेळीच दखल घेऊन शोध घेतल्यामुळे शंकर पारधी यांचा मुलाचा तीन तासातच शोध लावून त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी पोलीस कर्मचारी अमित दुबे, गजानन बांगरे व अनिल खरेकर यांनी परिश्रम घेतले.
रेल्वेतून बेपत्ता झालेल्या मुलाचा तीन तासात शोध
By admin | Published: April 08, 2016 2:08 AM