अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अकोट तालुक्यातील अडगाव (खु) जंगलात घोरपडची शिकार करणाºया तिघा जणांना बुधवारी वन विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.वनपरिक्षेत्र अधिकारी पी.डी. पाटील यांच्यासह हिवरखेड येथील फिरत्या संरक्षण दलाला गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अडगाव येथील डॉ. ढोणे आश्रमशाळेजवळ सापळा रचून वन विभागाने राजेश सुभाष भोसले (२८) रा. आंबोडा (अकोलखेड ) ता. अकोट, अर्जुन काश्या भोसले (३३) रा. आंबोडा आणि विकास सुभाष भोसले (३३) रा. चितलवाडी, ता. अकोट यांना ताब्यात घेतले. आरोपींची झडती घेतली असता, विकास भोसले यांच्याकडील एका थैलीमध्ये जिवंत घोरपड गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आली. आरोपींची चौकशी केली असता, आरोपींनी ही घोरपड अकोट येथील शेतशिवारातून आणल्याचे सांगितले. आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६), ९, ३९, ४८ (अ) ५0, व ५१ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक टी. ब्युला एलील यांच्या मार्गदर्शनाखाली बी.डी. कटारिया, वनरक्षक आतिफ हुसैन, एन.बी. अंभोरे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
घोरपडची शिकार करणारे तिघे गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:15 AM