अकोला, दि. ३- राज्यात व जिल्हय़ात सातत्याने महिला, युवती, चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. एकंदरीत महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. अकोला जिल्हय़ात गत तीन दिवसांमध्ये बलात्काराच्या पाच घटना घडल्या आहेत. या घटनांवरून शासन आणि पोलिसांच्या योजना किती कुचकामी ठरत आहेत, हे दिसून येते. पिंजर पोलीस स्टेशनअंतर्गत वस्तापूर झोडगा येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार, बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या करतवाडी येथील तरुणाने १७ वर्षीय युवतीवर बलात्कार केला. बाश्रीटाकळी येथेसुद्धा महिलेवर बलात्कार केल्याच्या घटना अलिकडेच्या काळात घडल्या आहेत. जिल्हय़ात सातत्याने लैंगिक शोषण, अत्याचार, छेडखानीच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे अकोल्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अशा प्रकारची गंभीर घटना घडल्यानंतर पोलीस तात्पुरत्या उपाययोजना करून वेळ मारून नेतात. महिला किंवा नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, अशा ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने अकोल्यातील चित्र दिवसेंदिवस भयावह होत आहे.
तीन दिवसात बलात्काराच्या पाच घटना!
By admin | Published: November 04, 2016 2:30 AM