सायखेड : चिंचोली रुद्रायणी शिवारातील शेतात हरभरा सोंगणीसाठी गेलेल्या तिघांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने जखमी झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
चिंचोली रुद्रायणी येथील शेतकरी विनोद पुंजाजी घोरड व यश विनोद घोरड, अंकुश किशेर घोरड हे शेतात हरभरा सोंगणीचे काम करीत होते. आगेमोहाचे पोळ असलेल्या घाडाच्या फांदीवर वानराने उडी मारल्याने अचानक मधमाश्यांचा हल्ला सुरू झाला. हा हल्ला इतका भयानक होता की, मधमाश्या गावात घुसल्या. ग्रामस्थांनी टेंभे पेटवून व शेकोट्या पेटवून मधमाश्यांना पळवून लावले. जखमींना धाबा येथे उपचारांसाठी क्लिनिकमध्ये दाखल केले. यांपैकी विनोद घोरड हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले.
पुनोती शिवारात अवकाळी पावसासह गारपीट
सायखेड : १८ फेब्रुवारी रोजी पहाटे वादळी पावसासह तुरळक गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे व फळबागेचे नुकसान झाले. गत दोन दिवसांपासून बार्शीटाकळी तालुक्यात दाट ढगाळ वातावरण होते. १८ फेब्रुवारीच्या पहाटे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची दाणदाण उडाली. हरभरा पिके सोंगून लावण्यात आलेल्या गंजीमध्ये पाणी शिरले. यामध्ये हरभरा, गहू, भाजीपाला, फळबाग आदी पिकांचे काही भागात नुकसान झाले.