अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील रहिवासी तथा मुंबई येथे आरोग्य उप-संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दयाराम चव्हाण यांच्या रामसदन बंगल्यात चोरट्यांनी हैदोस घालत बंगल्यातील कपाटे फोडून त्यातील ७० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह चांदी आणि रोख रक्कम पळविल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. घरमालकासह कुटुंबीय शेतावर असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातील मुद्देमाल पळविला असून, याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मुंबई येथे आरोग्य उप-संचालक असलेले डॉ. दयाराम चव्हाण यांचे कुटुुंब या बंगल्यात राहते. यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या गावी शेतीच्या कामानिमित्त गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील कपाटे फोडली. त्यामधील दोन सोन्याच्या बांगड्या ३० ग्रॅम, लहान पोत १५ ग्रॅम, मोठी पोत २० ग्रॅम, १ अंगठी पाच ग्रॅम, पूर्ण चांदीचा हातापायातील चाळ ६० ग्रॅम, चांदीचे लक्ष्मी गणपती असे ४० ग्रॅम सोने व चांदीचे दागिने आणि २१ हजार रुपये, होम थिएटर, टीव्ही, आठ मोबाइल, दोन घड्याळ, एक सायकल व एक कॅमेरा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी प्रशांत जाधव यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी दोन लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खदानचे ठाणेदार किरण वानखडे यांनी पंचनामा केला. डॉगस्कॉड व फिंगर प्रिंट एक्स्पर्ट टीमनेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा गेले. लवकरच या चोरीचा छडा लावण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार किरण वानखडे यांनी दिली.
आरोग्य उपसंचालकांच्या घरातून तीन लाखांचे दागिने पळविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 8:08 PM