अकाेला : सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दवा बाजारात असलेल्या डाॅ. रहेमान खान यांच्या हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रिसाेड येथील एका कुटुंबातील महिलेकडून सुमारे तीन लाखांची राेकड अज्ञात चाेरट्यांनी पळविल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली़. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाेरट्यांचा शाेध सुरू करण्यात आला आहे़.
वाशिम जिल्ह्यातील रिसाेड येथील रहिवासी प्रा़ अनीस खान हे त्यांच्या वडिलांना व पत्नीला साेबत घेऊन डाॅ़ रहेमान खान यांच्या हाॅस्पिटलमध्ये रविवारी आले़ त्यानंतर त्यांच्या वडिलांना घेऊन ते डाॅक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी निघाले असता त्यांच्याकडे असलेली तीन लाखांची राेकड त्यांनी बाहेर बसलेल्या पत्नीकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली़; मात्र, यावेळी लक्ष ठेवून असलेल्या काही महिला व पुरुषांनी त्यांना भूलथापा देऊन प्रा़ अनीस खान यांच्या पत्नीजवळील तीन लाखांची राेकड लंपास केली़. अनीस खान केबिनमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्नीला पैशासंदर्भात विचारणा केली असता त्यांच्या पत्नीने रक्कम चाेरी गेल्याची माहिती दिली़ यावरून त्यांनी सिव्हिल लाइन्स पाेलीस स्टेशन गाठून या प्रकरणाची तक्रार दिली़. पाेलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून चाेरट्यांचा शाेध सुरू केला आहे़.
चाेरटे सीसीटीव्हीत कैद
डाॅ़ रहेमान खान यांच्या हाॅस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत़. त्यामुळे पाेलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चाैकशी सुरू करताच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली़ . यामध्ये चाेरटे स्पष्ट दिसून आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे़. सीसी कॅमेऱ्यांमुळे या चाेरीचा लवकरच छडा लागणार असल्याची माहिती आहे़.