शेतकऱ्यांना लवकरच मिळणार अद्ययावत सात-बाराअकोला : जिल्ह्यात संगणकीकृत सात-बारा उताऱ्यातील चुका दुरुस्तीचे काम ‘एडिट मोड्युल’द्वारे तलाठ्यांमार्फत सुरू असून, जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार १८१ सात-बारापैकी मार्च अखेरपर्यंत ३ लाख ३१ हजार ५७ ‘सात-बारा’मधील चुकांची दुरुस्ती करून ‘सात-बारा’अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच ‘आॅनलाइन’ अद्ययावत सात-बारा उपलब्ध होणार आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यात तलाठी दप्तराच्या संगणकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यात ई-फेरफार प्रणाली कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये संगणकीकृत करण्यात आलेल्या सात-बारामधील त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम ‘एडिट मोड्युल’द्वारे तलाठ्यांमार्फत करण्यात येत आहे. सात-बारामधील त्रुटींची दुरुस्ती करून सक्षम अधिकाऱ्यांच्या ‘डिजिटल’ स्वाक्षरीसह शेतकऱ्यांना अद्ययावत सात-बारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ३ लाख ५४ हजार १८१ संगणकीकृत सात-बारा उतारे असून, त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ३ लाख ३१ हजार ५७ सात-बारा उताऱ्यातील चुका दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. चुकांची दुरुस्ती करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आॅनलाइन अद्ययावत सात-बारा लवकरच उपलब्ध होणार आहे.‘सात-बारा’मधील चुकांची अशी करण्यात आली दुरुस्ती!जिल्ह्यात ‘एडिट मोड्युल’द्वारे ३ लाख ३१ हजार ५७ सात-बारा उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये अकोला तालुक्यात ९६ हजार ७२७, अकोट तालुक्यात ४८ हजार ४०७, तेल्हारा तालुक्यात ३६ हजार ७९५, पातूर तालुक्यात ३० हजार ५४, बार्शीटाकळी तालुक्यात ३४ हजार ७९०, बाळापूर तालुक्यात ४५ हजार ४१८ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ३८ हजार ८६६ सात-बारामधील चुकांची दुरुस्ती करण्यात आली असून, सात-बारा अद्ययावत करण्यात आले आहेत.‘एडिट मोड्युल’द्वारे सात-बारा मधील त्रुटी व चुकांची दुरुस्ती करण्याचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून, चुका दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आॅनलाइन अद्ययावत सात-बारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. - प्रमोद देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल).
तीन लाखांवर ‘सात-बारा’ंमधील चुकांची दुरुस्ती!
By admin | Published: April 06, 2017 1:42 AM