अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे अंकेक्षण अहवाल टिपले आहेत. यापूर्वीच्या एका आर्थिक वर्षातील अंकेक्षण अहवालातील गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याकरीता दोनवेळा दोन सदस्य समिती नेमण्यात आली होती; परंतु २६ मार्च रोजी सुधारित चौकशी आदेशानुसार पथकाचे प्रमुख अप्पर विशेष लेखापरीक्षक आर. एम. जोशी, सहाय्यक म्हणून प्रतवार पर्यवेक्षक एस. एस. खान, बाळापूरचे सहाय्यक सहकार अधिकारी डी. डी. गोपनारायण यांचा समावेश असलेले पथक जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांनी नेमले आहे. अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीचा आर्थिक वर्षातील अंकेक्षण टिपणीतील दोषदुरुस्ती अहवाल मुद्दा क्रं. १ ते ९ बाबत माहिती, अपात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याबाबत, वसुली पात्र बाजार फी, बाजार फी वसुलीच्या पद्धतीमुळे सुटलेले हिशेब पटयातील बाजार फीची आकारणी, भाव व वजनातील फरकामुळे कमी वसुली झालेली बाजार फी, बाजार शुल्क. सोबत दिलेल्या गोषवारानुसार खुलासा, भाडेकरार तपासणी, उपबाजाराबाबतची माहिती,अनुज्ञप्ती विभागातील मुद्द्यांवर माहिती, कापूस अनुज्ञप्ती माहीती, कापूस खरेदी/विक्री व्यवहार व बाजार फीबाबत, तसेच हिशेब पट्ट्यांबाबत व अडत्याचे व्यवहार व माहिती आदी गंभीर मुद्द्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीकरीता त्रिसदस्यीय पथक बाजार समितीत आले. त्यांनी चौकशी सुरू केली असून, दरम्यान, ही चौकशी किती गंभीरपणे करण्यात येते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती अकोट बाजार समितीत दाखल, चौकशी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:19 AM