गजानन वाघमारे
बार्शीटाकळी: खोट्या दस्तावेजाच्या आधारे प्राचार्य मधुकर रंगलाल पवार यांनी प्राचार्य पदास मुदतवाढ मिळविल्याचा आरोप करीत प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किसन रंगलाल पवार यांनी शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी या प्रकरणी दखल घेत उच्च शिक्षण संचालकांना आठ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या तीन सदस्यीय समितीने दि. ३ सप्टेंबर रोजी शहरातील गुलाम नबी आझाद महाविद्यालयात भेट देऊन चौकशी केली आहे.
तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश एन. मालोदे, सदस्य डॉ. सुबोध भांडारकर व सुनील इंगळे यांचा समावेश आहे.
प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किसन रंगलाल पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर रंगलाल पवार यांनी प्राचार्यपदास मुदतवाढ मिळविण्यासाठी संस्थेच्या लेटर पॅडचा गैरवापर केला. खोट्या शिक्क्याचा वापर करून सचिवांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून तसेच खोट्या दस्तावेजाच्या आधारे प्रस्ताव विद्यापीठामार्फत शासनाकडे सादर केला. प्राचार्यपदाची वयोमर्यादा ६२ वर्षांवरून ६५ वर्षे करून घेतली. खोट्या दस्तावेजाच्या आधारे प्राचार्यपदाची मुदतवाढ मिळविली. त्या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश एन. मालोदे, डॉ. सुबोध भांडारकर, डॉ. सुनील इंगळे यांनी प्राचार्य मधुकर पवार यांची सखोल चौकशी केली. त्यानंतर सचिव किसन पवार यांची समितीने बाजू ऐकली आहे. यावेळी समितीसह प्राचार्य मधुकर पवार, सचिव किसन पवार व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
पुढील चौकशी शिक्षण सहसंचालक मुरली वाडेकर यांची समिती पुढील आठवड्यात महाविद्यालयात येऊन करणार असल्याची माहिती आहे.
---------------
प्राचार्य मधुकर पवार यांच्याकडून प्राचार्यपदाची मुदतवाढीचा मूळ दस्तावेज असलेला प्रस्ताव चौकशी समितीला मिळाला नाही. आम्ही सहसंचालक शिक्षण अमरावती यांच्या आदेशान्वये चौकशीकरिता आलो होतो. प्रस्तावावरील सचिवांच्या सह्या तज्ज्ञांकडून तसेच फॉरेन्सिक लॅबमध्ये तत्काळ तपासली जाईल, पुढील चौकशी शिक्षण सहसंचालक मुरली वाडेकर यांची समिती येऊन करणार आहे. प्रकरण जास्तीत जास्त पंधरा दिवसात निकाली काढण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत.
- डॉ. सतीश माळोदे,
अध्यक्ष, त्रिसदस्यीय समिती,
सहसंचालक शिक्षण, अमरावती.