अकोला : ठेव म्हणून दिलेले दोन लाख रुपयांची परतफेड न केल्याप्रकरणी तसेच दिलेला धनादेश अनादरीत झाल्यानंतर या प्रकरणात आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीने फिर्यादी यांना तीन लाख वीस हजार रुपये देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नरेंद्र राधाकिसन भाला यांनी सुशील लेखराजमल पारवानी यांना दोन लाख रुपये व्यावसायिक व्यवहारात ठेव म्हणून दिले होते.
याच्या परतफेडसाठी सुशील पारवाणी यांनी एक धनादेश नरेंद्र भाला यांना दिला होता. व्यवहार संपुष्टात आल्यानंतर ठेवलेली दोन लाख रुपयांची रक्कम नरेंद्र भाला यांनी परत माहिती असता सुशील पारवाणी यांनी ती रक्कम दिली नाही. त्यामुळे दिलेला धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता तो अनादरीत झाला. त्यानंतर रीतसर नोटीस पाठवून त्यांच्याविरुद्ध कलम १३८ अन्वये न्यायालयात दावा दाखल केला. यावर न्यायालयाने सुशील पारवाणी यास तीन महिन्यांच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस तीन लाख वीस हजार रुपये देण्याचे आदेश दिला आहे. या प्रकरणी भाला यांच्यावतीने अड गणेश नरेंद्र अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.