नांदुरा (जि. बुलडाणा): आधीच चार दिवसात चारा टंचाईमुळे पाच गायींचा मृत्यू झालेल्या नांदुरा शहराजवळील खामगाव तालुक्यातील आमसरी शिवारात असलेल्या महादेव गौरक्षणात ११ जूनच्या दुपारी आणखी तीन गायींची प्रकृती खालावली असून ५६0 गायी असलेल्या या गौरक्षणात चारा टंचाईमुळे शेकडो गायी मृत्यूच्या दाढेत अडकल्या आहेत; मात्र आजही चारा छावणी देण्याची जबाबदारी असणारे जिल्हाधिकारी कार्यालय ढिम्म पडले आहे.२५0 पेक्षा जास्त गायी असणार्या गौरक्षण संस्थेला चारा छावनी देण्याबाबत किंवा चार्यासाठी अनुदान देण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार मागील दोन महिन्यांपासून महादेव गौरक्षण संस्थान नांदुरा हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ओटे झिजवत आहे; मात्र अद्यापही या कार्यालयाने चारा छावणी दिली नाही. संस्थानने जिल्हा व राज्याबाहेरून चारा विकत आणला; मात्र आता चारा विकत मिळत नसल्याने मोठी चारा टंचाई निर्माण झाली आहे. आज रोजी गौरक्षणातील शेकडो गायी मृत्यूच्या दाढेत ओढल्या गेल्या असून त्यापैकी पाच गायींचा मृत्यू झाला असून आता नव्याने तीन गायी प्रकृती खालावली असून त्या मरणासन्न अवस्थेत पोहचल्या आहेत. पाऊस आल्यानंतरही सुमारे दोन महिन्यानंतर चारा उपलब्ध होणार आहे. तोपर्यंंत ५६0 गायींना चारा कसा उपलब्ध करावा, या चिंतेने संस्थानचे संचालक चिंताग्रस्त झाले आहेत. यापूर्वी पाच गायींचा मृत्यू झाला. तर आता तीन गायी नव्याने मरणासन्न अवस्थेत पोहचल्याने चारा छावणी किंवा अनुदान देण्यासाठी आणखी किती गायींचा बळी जिल्हा प्रशासनाला हवा आहे. असा संतप्त प्रश्न गोभक्तांना सतावत आहे. वातानुकूलित कॅबीनमध्ये आरामदायी खुर्चीवर बसणार्या वरिष्ठ अधिकार्यांना चार्याअभावी उपासमारीने मरणासन्न अवस्थेतील गायींचे दु:ख समजणे अवघड आहे. त्यामुळेच चारा छावणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील फाईलीमध्ये अडकला आहे.
चा-याअभावी आणखी तीन गायी मरणासन्न अवस्थेत
By admin | Published: June 12, 2016 2:18 AM