अकोला: शहरात व गावात भाइगिरी करणाऱ्या तीन गावगुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शुक्रवारी जारी केला. शहरात टाेळक्याने भाइगिरी करणाऱ्यांची कुंडली जमा करण्याचे निर्देश पाेलिस यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती आहे.
आगामी दिवसांत शहरासह जिल्हाभरात विविध सण,उत्सवांची लगबग सुरु हाेणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशातून विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांना लगाम लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी पाेलिस यंत्रणेला कठाेर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील जावेद खान युनुस खान रा. कैलास टेकडी, जेतवन नगर, विक्की उर्फ विवेक सुनिल शिंदे रा. गायत्री नगर, मोठी उमरी या दाेघा गावगुंडांना प्रत्येकी ६ महिन्यांसाठी तसेच नमो राजाराम तायडे रा. नविन प्लॉट, ग्राम उगवा याला ३ महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या आरोपींविरुध्द दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांचेविरूध्द कलम ५६ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला हाेता.