सचिन राऊत / अकोला : अक्षय्यतृतीयेच्या रात्री कापशी गावात पोलिसांनी रात्रभर घातलेल्या हैदोस प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, या चौकशी अहवालात तीन पोलीस अधिकार्यांवर दोषारोप ठेवण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. लोकमतचा प्रभावी पाठपुरावा व चौकशी अहवालाच्या आधारे चार पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे; मात्र ज्या पोलीस अधिकार्यांनी हा हैदोस घालण्याचे आदेश दिले त्यांची पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांकडून पाठराखण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हैदोसप्रकरणी सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, डीवायएसपी रत्नाकर नवले व पातूरचे ठाणेदार वाघू खिल्लारे यांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. कापशी गावात अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पत्त्याचा डाव खेळण्याची परंपरा गत अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेनुसार जिल्हय़ातील बरीच मंडळी अक्षय्यतृतीयेच्या दिवशी कापशी गावात पत्त्याचा डाव खेळत असताना पोलिसांनी छापा मारला. डावातील पैसे देवाण-घेवाणीच्या कारणावरून पोलीस व जुगारींमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. पोलिसांना मारहाण करणारे गावातीलच असल्याच्या संशयावरून पोलिसांनी कापशी गावात रात्रभर हैदोस घातला. महिला, वृद्ध व बालकांना मारहाण केली, दुचाक्यांची तोडफोड, कुलर फेकले, जनावरांना मारहाण, विद्युत मीटरची तोडफोड, दरवाजे, घरातील साहित्याची नासधूस केली. या प्रकरणाचे सखोल वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांनी कापशी गावात भेट देऊन प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडे दिली. खाटमोडे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सादर केला असून, यामध्ये तीन पोलीस अधिकार्यांवर दोषारोप ठेवण्यात आला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यामध्ये सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, डीवायएसपी रत्नाकर नवले व पातूरचे ठाणेदार यांचा समावेश आहे.
चौकशी अहवालात तीन पोलीस अधिका-यांवर ठपका
By admin | Published: June 24, 2015 2:02 AM