लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : शासनाने मास्कचे दर ठरवून त्या दरानुसारच विक्री करण्याचा आदेश दिला असला तरी अकाेला शहरातील अनेक औषध व्यावसायिकांना याची कल्पनाच नसल्याचे लाेकमतने २९ ऑक्टाेबर राेजी केलेल्या पाहणीतून आढळून आले.
शहरातील माेजके ४ ते ५ औषधी दुकाने वगळता असा काही निर्णय झाला आहे याची कल्पनाच नाही. त्यामुळे दाेन व तीन पदरी असलेले मास्क १० रुपयांपासून विक्री हाेत असल्याचे दिसून आले. एन ९५ मास्क काही माेजक्याच औषधी दुकानावर दिसून आले. त्याचे दरसुध्दा काही दुकानदार ८० रुपये घेत असल्याचे स्पष्ट झाले. काेणत्याच दुकानासमाेर मास्कचे दर लावल्याचे फलकसुद्धा आढळून आले नाहीत.
निर्णय वाचला; पण आदेश नाही शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच मास्क विकल्या जात नसल्याचे रतनलाल प्लाॅट परिसरातील दाेन दुकानांमध्ये चाैकशी केेली असता समाेर आले.
यासंदर्भात त्यांना शासनाच्या दराबाबतची कल्पना आहे का, याची विचारणा केली असता असा निर्णय झाला हे माहित आहे; मात्र अधिकृत सूचना मिळाली नसल्याची सारवासारव त्यांनी केली. मास्कची खरेदी जुनीच आहे त्यामुळे नवे भाव कसे लावावे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मास्कचा भाव नाही
जठारपेठ परिसरात असलेल्या दुकानात मास्क ग्राहकाने मागितल्यावर मास्कचे दर सांगितले जातात. मास्क स्वस्त झाल्याचे ग्राहकाने सांगितल्यावर मेडिकलवर कुठे भाव हाेता का, असा प्रतिप्रश्न विचारण्यात आला. स्वस्तात स्वस्त १० रुपयांपासून तर १५० रुपयांपर्यंत मास्क आहेत. मास्कचा दर्जा पाहून त्याचा भाव ठरलेला असताे. सरकारने जाहीर केलेले भाव हे काेणत्या दर्जाचे आहेत, ते ही पाहावे लागेल, असा सल्लाही दिला.
नियमाची माहिती नाही
शहरातील नेकलेस रस्त्यावरील एका औषधी दुकानामध्ये एन ९५ मास्कबाबत चाैकशी केली असता ४० ते ५० रुपयापर्यंत मास्क मिळेल असे सांगण्यात आले. एन ९५ मध्येही दर्जानुसार भाव बदलतात, असेही त्यांनी सांगितले. नियमाबाबत माहिती नाही. अजून अधिकृत सूचना मिळाली नाही, असे त्यांनी सांगतले मात्र आम्ही आधीपासूनच इतरांपेक्षा कमी दरातच मास्कची विक्री करताे.