पांढुर्णा : मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेतून तयार करण्यात आलेल्या पातूर तालुक्यातील पांढुर्णा-पिंपळडोळी रस्त्याचे एका वर्षातच तीनतेरा वाजले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले आहेत. रस्ता कामात ठेकेदाराने दिरंगाई करून रस्त्याचे काम निकृष्ट केल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
पांढुर्णा या गावाला स्वातंत्र्यापासून रस्ता नव्हता. गावाला रस्ता तयार करून मिळावा, यासाठी गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. अखेर २०१९ ला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पांढुर्णा- पिंपळडोळी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यामुळे गावकाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र एका वर्षातच गावकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. एका वर्षातच रस्त्याचे तीन तेरा वाजले. रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. ५.६ किलाेमीटर असलेल्या रस्त्याची एका वर्षातच दुरवस्था झाली आहे. थातूरमातूर पद्धतीने तयार केलेला रस्ता खड्डेमय झाला आहे. संबंधित ठेकेदाराने कामात दिरंगाई केल्याचा आराेप नागरिकांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असताना कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. पूर्ण रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुन्हा नव्याने रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी गावातील सर्व नागरिकांकडून होत आहे.