लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील १ हजार ४४६ मतदान केंद्रांवर गत शनिवारी राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत तीन हजार मतदारांकडून अर्ज सादर करण्यात आले. त्यामध्ये मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी २ हजार ७४९ नवीन मतदारांनी अर्ज सादर केले.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १८ ते २१ वयोगटातील तरुण मतदारांसह ज्यांची मतदार यादीत नावे नाहीत, अशा पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी १ जुलै ते ३१ जुलै या महिनाभराच्या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शनिवार, ९ जुलै रोजी जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघातील १ हजार ४४६ मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) अर्ज स्वीकारण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील ३ हजार १० मतदारांकडून अर्ज सादर करण्यात आले. त्यामध्ये मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी २ हजार ७४९ नवीन मतदारांकडून नमुना क्र.६ चे अर्ज सादर करण्यात आले, तसेच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी ७७, नावात दुरुस्तीसाठी १४९ आणि स्थानांतरणाच्या नोंदणीसाठी ३५ मतदारांकडून अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत येत्या २२ जुलै रोजीदेखील जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत तीन हजार मतदारांचे अर्ज!
By admin | Published: July 13, 2017 12:54 AM