अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली असल्याने थेट योजनेच्या आयुक्तांनीच त्या कामांची यादी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना पाठवली. त्यानंतरही त्या कामांमध्ये काहीच प्रगती न झाल्याने या कामांबाबत यंत्रणेची उदासीनता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील २९३५ कामे अपूर्ण असल्याची माहिती आहे. रोजगार हमी योजनेची कामे करणाऱ्या विविध यंत्रणा कमालीच्या उदासीन आहेत. त्यातच शेतरस्त्यांची कामे कमी असल्याने जलसंधारणाच्या कामांचे प्रमाण पाहून अनेकांनी ती कामे केलीच नाहीत, त्यामुळे २०१४-१५ मध्ये मंजूर असलेल्या कामांपैकी २५ टक्क्यांपेक्षाही अधिक कामे दोन वर्षानंतरही अपूर्ण आहेत. या कामांचा आढावा राज्याच्या रोजगार हमी योजना आयुक्तांनी घेतला. त्यावेळी अपूर्ण कामांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना नोटिसही बजावण्यात आल्या. त्याचा जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे चित्र आजही आहे. मंजूर कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करण्याचे बजावण्यात आले. त्यापैकी केवळ २५ ते ३० कामांचे प्रमाणपत्रच रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले. त्यातून या कामांचा वेग अत्यंत हळूवार असल्याचेही स्पष्ट होत आहे.
रोहयोची तीन हजार कामे अपूर्ण!
By admin | Published: May 04, 2017 12:52 AM