संतोष येलकर / अकोला: गतवर्षीच्या दुष्काळी मदत वाटपात गाव बदलून एकाच शेतकर्याच्या नावाने तीनदा मदत वाटप करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, अशाच प्रकारे आणखी काही बोगस लाभार्थ्यांना मदत वाटप करण्यात आल्याच्या शक्यतेच्या पृष्ठभूमीवर, अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत मदतनिधी प्राप्त झाला होता. एकरी १ हजार ८00 रुपयेप्रमाणे प्रशासनामार्फत दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या याद्यांसह धनादेशाद्वारे प्रशासनामार्फत शेतकर्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली. अकोला तालुक्यात म्हातोडी येथील श्रीकृष्ण वारके यांच्या नावाने म्हातोडी येथे दोन एकर शेती असून, पीक नुकसान भरपाईपोटी यांना एकरी १ हजार ८00 रुपयेप्रमाणे ३ हजार ६00 रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यानंतर घुसरवाडी येथे वारके यांची शेती नसतानाही, दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या यादीत त्यांचे नाव टाकण्यात आले आणि ९ हजार रुपयेप्रमाणे १८ हजार रुपयांची मदत त्यांना देण्यात आली. म्हातोडी येथील तत्कालीन तलाठी गायत्री काकड यांनी तयार केलेल्या लाभार्थी शेतकर्यांच्या याद्यानुसार ही मदत वाटप करण्यात आली. १८ हजार रुपयांच्या मदतीपैकी ९ हजार रुपयांच्या मदतीचा वारके यांचा धनादेश व अन्य एका शेतकर्याच्या मदतीचा धनादेश, त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अकोला तहसील कार्यालय अंतर्गत दहिहांडाचे मंडळ अधिकारी बी. रायबोले यांच्याकडे आला. रायबोले यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदत वाटपाच्या यादीची तपासणी केली असता, मदत वाटपाच्या यादीत म्हातोडी येथील श्रीकृष्ण वारके यांचे पुन्हा नाव आले असून, त्यांना मदत वाटपाचे तीनदा धनादेश देण्यात आल्याचे आढळून आले. हा प्रकार मंडळ अधिकारी रायबोले यांनी १७ जानेवारी रोजी अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार तहसीलदार हांडे यांनी यासंदर्भात नायब तहसीलदार पूजा माटोडे यांना चौकशी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.