अकोला : जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील १८१ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि आलेगाव -नवेगाव व देऊळगाव-पास्टूल या दोन पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करून पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर या तीनही योजना ताब्यात घेण्याचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.अकोट व तेल्हारा तालुक्यातील १८१ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पूर्ण करण्यात आल्यानंतर ही योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ताब्यात घेण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. तसेच आलेगाव -नवेगाव ही १४ गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व देऊळगाव -पास्टूल ही १६ गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या दोन्ही पाणी पुरवठा योजनांचे मुख्यमंत्री पेयजल योजनेत पुनरुज्जीवन करून, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर या पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ताब्यात घेण्याचे सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखॉ पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, समिती सदस्य सरला मेश्राम, गोपाल कोल्हे, श्रीकांत खोने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.