अकोला : मुर्तीजापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणात सीरसो येथील रहिवासी असलेल्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरण्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले आहे.
सिरसो येथील रहिवासी मयूर दिलीप गिरी वय २५ वर्ष याने मुर्तीजापुर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी मुर्तीजापुर पोलिसांनी मयूर गिरी यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले .जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी विरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्यास भारतीय दंडविधानाच्या कलम ३६३ अन्वये तीन वर्ष शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावला.
दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान केले आहे. तर कलम ३५४ अन्वये दोन वर्ष कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावे लागणार असून आरोपीने आतापर्यंत भोगलेली शिक्षा यामधून कमी करण्यात येणार आहे. तर पोस्को प्रकरणांमध्ये आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पीएसआय प्रवीण पाटील यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले तर श्रीकृष्ण गावंडे यांनी त्यांना सहकार्य केले.