संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीत तेजी आल्याने अकोला सराफा बाजारात उभारी आली आहे. सोन्या-चांदीचे भाव उधारल्याने सराफा बाजारपेठेत गुंतवणूदार आणि खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत आलेल्या तेजीमुळे सणासुदीत सोन्या-चांदीच्या दागिण्यांना चांगला उठाव येण्याचे संकेत जाणकारांकडून मिळत आहेत. नोटाबंदी आणि तीन टक्के जीएसटीनंतर सराफा बाजारात मंदी होती; मात्र सणासुदीनिमित्त सराफा बाजारातील चमक वाढली आहे. नवरात्रीपासून ग्राहक मोठय़ा प्रमाणात सराफा बाजाराकडे वळला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव ३0 हजार ४00 वरून आता थेट ३0 हजार ८00 प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. ही तेजी केवळ सोन्यातच नव्हे, तर चांदीतही दिसून येत आहे. चांदी ४0,000 हजार रुपये किलोवर स्थिरावली होती. ती उसळून आता ४0 हजार ५00 किलोच्या घरात पोहोचली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर आलेल्या तेजीमुळे अकोला सराफा बाजारातील उलाढाल वाढली आहे. दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीजच्या मुहूर्तांपासून सोन्या-चांदीच्या खरेदीला सुरुवात होते; मात्र यंदा बाजारात नवरात्रीतच तेजी आल्याने दिवाळीची बाजारपेठ चांगली राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सणासुदीचा सेल चांगला होईल म्हणून व्यापार्यांनी चांदीत गुंतवणूक केली आहे. ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.-सुनील जांगिड, विश्वकर्मा ज्वेलर्स, अकोला.
धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने चांदीच्या दागिन्यांवर मोठी उलाढाल होते. यंदाही अकोला जिल्हय़ातील सराफा व्यापार्यांनी मोठी खरेदी केली आहे. बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी वाढत आहे.-राजेश ठकार, चांदीचे ठोक व्यापारी, अकोला.
दरवर्षी दसर्यापासून बाजारात उठाव येतो. यंदाही तशी स्थिती निर्माण होत आहे. कास्तकारांजवळ आलेला पैसा दिवाळीनिमित्त बाजारपेठेत येतो. त्यामुळे शुद्ध सोन्याचे दागिने, बदाम अंगठी आणि मिनी मंगळसूत्र खरेदीदारांची गर्दी वाढते. सराफा व्यापारी आमच्याकडून दागिने विकत घेतात, त्यानंतर ते ग्राहकास विकतात.-हिरेन वखारिया, डीपी ज्वेलर्स, अकोला.