शहरासह जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काेराेनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. त्यानंतर पुन्हा ८ मार्चपर्यंतचे आदेश निगर्मित करण्यात आले. यादरम्यान, नियमांचे पालन करण्याच्या अटीवर व्यापाऱ्यांना ठराविक मुदतीत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, असा रेटा व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे लावून धरला हाेता. ही बाब ध्यानात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्चपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने खुली करण्यासाेबतच व्यापारी व दुकानातील कामगारांना काेविड चाचणी बंधनकारक केली.
अहवाल मिळण्यास विलंब तरीही कारवाई
‘आरटीपीसीआर’च्या तुलनेत रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त हाेताे. परंतु चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने या अहवालास विलंब हाेत आहे. असे असतानाही मनपा व संयुक्त पथकांकडून दुकाने बंद करण्याची कारवाई केली जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आधी एक्सल शिट आता एसएमएस ग्राह्य
रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणाऱ्या व्यापाऱ्यांना काही ठिकाणी एक्सल शिट देण्यात आली. परंतु हा कागद मनपा मान्य करणार नसल्याचा मुद्दा व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे उपस्थित केल्यानंतर चाचणी केल्यास एसएमएस ग्राह्य धरण्यावर जिल्हा प्रशासनाने संमती दिल्याची माहिती आहे.
संघटित व्यापारी वेठीस!
शहरातील संघटित व्यापाऱ्यांना काेराेना चाचणी अनिवार्य केली जात असतानाच दुसरीकडे रस्त्यालगत व्यवसाय करणारे लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांना प्रशासनाने दुर्लक्षित केल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रीपासून ते साेमवारी सकाळपर्यंत संचारबंदीचा निर्णय लागू केला. व्यापाऱ्यांना शुक्रवारपासून दुकाने खुली करण्याची परवानगी दिल्यानंतर सकाळपासूनच दुकानांना सील लावण्याच्या कारवाईला प्रारंभ करण्यात आला. मनपा व महसूल प्रशासन साेमवारपर्यंत तग धरू शकले नसते का, यावर विचार करण्याची गरज आहे.
-किशाेर मांगटे पाटील, सचिव न्यू क्लाॅथ मार्केट असाेसिएशन
चाचणी केल्यानंतर अहवाल विलंबाने प्राप्त हाेत असल्याने व्यापाऱ्यांना माेबाईलद्वारे प्राप्त झालेला एसएमएस मनपाने ग्राह्य धरावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असता त्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
-नितीन खंडेलवाल, अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स, अकाेला
आम्ही २२ फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांना चाचणीसाठी वारंचार सूचना केल्या. चाचणी केल्यानंतर व्यापाऱ्यांना उद्या शनिवारपासून ताबडताेब कागदाेपत्री अहवाल देण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.
-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकाेला