ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
वाडेगाव मागील दोन ते अडीच वर्षांपासून वाडेगाव अकोला या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून पूर्ण रस्त्यावर खडी, मुरूम गिट्टी टाकून हा रस्ता अर्धवट स्थितीत ठेवण्यात आला आहे. इंदिरा नगर येथील ३५ वर्षीय महिलेला मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाच्या चाकाखालील दगड उडून लागल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार रोजी घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर दगड आडवे टाकून रस्ता बंद करण्यात आला.
दवाडेगाव अकोला या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून नकाशी येथील महेश मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवस रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोको दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी दिलेल्या अश्वासनानुसार रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर वाडेगाव येथील वंचितचे सुबोध डोंगरे, सुगत डोंगरे या युवकांनीसुद्धा रस्त्याकरिता प्रशासनातील वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या रस्त्याबाबत फक्त या सर्वांना अश्वासनावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची कार्यवाही व्हावी याकडे लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. दरम्यान, या रस्त्यामुळे आणखी अपघात हाेऊ नये म्हणून संबंधितांनी तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी माजी उपसभापती प्रशांत मानकर यांनी केली आहे.