एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ईटीआयएम आता कालबाह्य झाल्या आहेत. असे असतानाही त्या वापरण्याची सक्ती वाहकांना करण्यात येत आहे. या मशिन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकीट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहक त्रस्तही झाले असून, अनेक वाहकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. सद्य:स्थितीत विभागातील ९ आगारांत ९०८ ईटीआयएम मशीन पुरविण्यात आल्या आहेत. यापैकी ३८१ मशीन नादुरुस्त आहेत, तर ३२६ मशीन वापरात असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली आहे.
विभागातील बससंख्या - ३६५
तिकिटे काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन- ९०८
सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन- ३२६
गहाळ/डॅमेज मशीन - ७
सेंटरला दुरुस्तीसाठी पाठविलेल्या मशीन - १९४
वयोवृद्ध वाहकांच्या हाती तिकीट ट्रे
जुन्या मशीनचे प्रशिक्षण साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी देण्यात आलेले आहे. तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले; परंतु इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे जुन्या ट्रे वापराचा विसर पडला आहे. प्रशिक्षण नसल्याने चुकीचे तिकीट जाण्यासह कारवाईही अंगलट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तिकीट ट्रेचा वापर केलेल्या व प्रशिक्षित वयोवृद्ध वाहकांच्या हातात तिकीट ट्रे दिले आहेत.
लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्येच ईटीआयएम मशीन
विभागातील सर्वच आगारांत तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. सुस्थितीत असलेल्या ईटीआयएम मशीन केवळ लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमधील वाहकांकडेच दिसून येत आहेत. जवळपासच्या बस वाहकांच्या हाती तिकीट ट्रेच देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.