शिवपूर / परतवाडा(अकोला/अमरावती): अकोट तालुक्यातील शहापूर ते अमोनाच्या दरम्यान एक वाघ ३ मार्च रोजी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृतदेह कुजलेला असल्याने तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.शहापूर ते अमोनाच्या दरम्यान असलेल्या जंगलात काही ग्रामस्थांना रविवारी एक वाघ मृतावस्थेत आढळला. याविषयी ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. या वाघाचा मृतदेह कुजलेला असल्याने त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या वाघाचा मृत्यू कशाने झाला, याविषयी माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, वाघाचा मृत्यू विद्युत शॉकने झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. डॉक्टरांसह श्वान पथक घटनास्थळी बोलावण्यात आले. गस्त वाढविली असून वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे निरीक्षण व्याघ्र प्रकल्पासह मेळघाट वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी नोंदविले आहे. यापूर्वी आकोट वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)
वाघ मृतावस्थेत आढळला. घटनास्थळाचा पंचनामा व शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट सांगता येईल. यासंबंधाने तपास सुरू आहे.- विशाल माळी,विभागीय वनाधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा