पिंजर (जि. अकोला): येथून नजीक असलेल्या मोझरी खुर्द, सोनखास शिवारामध्ये एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २८ जून रोजी उघडकीस आली. यासंदर्भात माहिती पसरताच बघ्यांची गर्दी जमली होती. अखेर पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर वाघाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोझरी खुर्द येथे गाव तलावानजीक एक नाला असून, त्या नाल्याच्या वरील परिसरात पट्टेदार वाघ मृत्यू अवस्थेत आढळून आला. पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती पिंजर सर्कलमध्ये पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती. पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, बीट जमादार राजू वानखडे, चंद्रकांत गोरे, सतीश कथे, रोशन पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी वनविभागाचे डी.एफ.ओ. के. आर. अर्जुना, बार्शीटाकळीचे रेंजर संतोष डांगे, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वडोदे, राजेसिंह वोवे, वनपाल इंगळे आदी उपस्थित होते. अकोल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर पट्टेदार वाघाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...तर वाचू शकले असते वाघाचे प्राण?
पिंजर, सोनखास आणि धाबा परिसरात वाघ दिसल्याची माहिती नागरिकांनी बार्शीटाकळी आणि अकोला वनविभागाला दिली होती. या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या देखील प्रकाशित झाल्या. मात्र तरी देखील वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप वन्यप्रेमींनी केले आहे. शिवारात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असते, तर पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला नसता, अशी खंतही वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.
बार्शीटाकळी आणि अकोला तालुक्यातील लोकांनी वनविभागाला पट्टेदार वाघ दिसला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे ही घटना घडली आहे. दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करायला हवा.
- मुन्ना शेख,वन्य प्रेमी व सर्प मित्र अकोला.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या हलगर्जीमुळे ही गंभीर घटना घडली असून, वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
-अनुराधा ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या.
वाघाचे वय अंदाजे सहा ते सात वर्ष असून, या वाघाचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण कळणार आहे.
- सुरेश वडोदे, सहायक वनसंरक्षक, वनविभाग, अकोला.