धाड (बुलडाणा): हातपाय बांधून तलावात टाकलेल्या एका शेतमजुराचा मृतदेह रविवारी धाड येथे आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेमागे घातपाताची शक्यता असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. बुलडाणा तालुक्यातील धामणगाव रोडवर धाड येथून २ किलोमीटर अंतरावर डॉ. हिंमतराव बावस्कर यांचे बॅरीस्टर फार्म असून, या फळबागेच्या देखभालीसाठी गत ९ वर्षापासून बुलडाणा तालुक्यातील भडगाव येथील गुलाबराव रामा तायडे (वय ५७ वर्षे) हे कामाला आहेत. डॉ. बावस्कर कोकणातील रायगड जिल्ह्यात वैद्यकीय सेवा देतात. त्यांच्या पश्चात शेतीच्या संपूर्ण देखभालीचे काम करणारे गुलाबराव तायडे १५ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. नातलगांनी दोन दिवस शोध घेतला ;मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या आणि गळ्यात वजनदार पोते बांधलेल्या अवस्थेत आढळला. गुलाबराव तायडे हे भडगाव येथील रहिवासी असून, त्यांच्या पश्चात विधवा सून ज्योती गजानन तायडे आणि नात असल्याचे समजते. गावात त्यांचे कुणाशीही वैर नसल्याचे गावकरी सांगतात. गेली ९-१0 वर्षे सालगडी म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे गुलाबराव तायडे डॉ. बावस्कर यांच्या फार्मवरच मुक्कामी असायचे. नायलॉन दोराने हातपाय एकत्र बांधून आणि गळ्यात वजनदार पोते बांधून शेततलावात त्यांचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेमागे घातपाताची शंका व्यक्त होत असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
हातपाय बांधून मजुराला तलावात टाकले!
By admin | Published: October 19, 2015 1:41 AM