अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्यावतीने पुढाकार घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समितीच्यावतीने विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत असून, आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये प्रचार रथावर क्षमतेपेक्षा अधिक फलकाची साइज लावल्याने भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व वाहन चालकांवर २९ मार्च रोजी, आपातापा येथे विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसचे रवी शिंदे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५, भादंविच्या कलम ११८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आलेगावचे ग्रामविकास अधिकारी गजानन वावगे यांच्याविरुद्धही आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.