अकोला: जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक दि. २८ एप्रिलला होणार असून, त्यासाठी येथील बाजार समितीत अखेरच्या दिवसापर्यंत ७७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सोमवार, दि. ३ एप्रिल म्हणजेच अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस झाला. त्यामध्ये यापूर्वीच्या बहुतांश संचालकांचा समावेश आहे. उमेदवारी अर्जांची छाननी दि. ५ एप्रिलला होणार असून, सहकार क्षेत्रामध्ये हालचालींना वेग आला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात राज्यभरातील बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सहकार क्षेत्राचे लक्ष त्याकडे लागून होते. अडथळा दूर झाल्यानंतर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार, दि. २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली होती. अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३ एप्रिल होती. रात्री अखेरपर्यंत ७७४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. अकोला बाजार समिती ही सातही बाजार समितीमध्ये महत्त्वाची व कार्यक्षेत्रात मोठी असल्याने त्यामुळे ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राजकारणासह सहकारातील सर्वच गट कामाला लागले आहेत. अद्याप कुठल्याही गटाचे पॅनल तयार झालेले नाही. मात्र, अर्ज माघारीसाठी अवधी असल्याने तडजोडी होण्याची शक्यता आहे. तसेच अकोट, तेल्हारा या बाजार समितीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.