कुरणखेड : देशसेवा करून घरी परतल्यानंतर स्वतःच्या घराचे स्वप्न रंगवताना कुरणखेडचे माजी सैनिक संदीप यांच्यावर काळाने झडप घातली. माजी सैनिक संदीप घाटे यांचा शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील, दोन भावंडे असा आप्त परिवार आहे.
संदीप मधुकर घाटे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नवीन वस्ती, तर पाचवी ते दहावी गजानन महाराज विद्यालयात व अकरावी ते बारावी परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू येथे झाले. ते सन २००२ सैन्यात दाखल झाले होते. त्यांनी १७ वर्षे १४ दिवस देशसेवा केली. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते घरी परतले होते. संदीप घाटे यांनी सांभा जम्मू-काश्मीर, सिक्किम, पुणे महाराष्ट्र, अखनूर जम्मू-कश्मीर, भूतान-दिल्ली, साऊथ आफ्रिका, धना मध्यप्रदेश, गुरेज सेक्टर जम्मू-काश्मीर, बेळगाव कर्नाटक येथे सेवा बजावली. ते डिसेंबर २०१९ रोजी सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते.
शहरात घर असावं, मुलाबाळांचे शिक्षण शहरात व्हावे, अशी इच्छा असल्याने ते कुरणखेड येथून घराच्या शोधासाठी अकोला येथे ये-जा करीत होते. अशातच नियतीने डाव साधला. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
------------------
माजी सैनिक संदीप घाटे यांना मिळालेली मेडल्स
माजी सैनिक संदीप घाटे यांनी सैन्यात असताना सैन्य सेवा मेडल सी जम्मू काश्मीर, सायक मेडल हाय ॲटिट्यूड १८, २०० फूट, नऊ वर्ष सर्व्हिस मेडल, विदेश सेवा मेडल साऊथ स्टुडंट साऊथ आफ्रिका अशी अनेक मेडल्स मिळविली आहेत.