अजूनही वेळ गेलेली नाही, पण...; काँग्रेसची 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांना साद
By नितिन गव्हाळे | Published: April 4, 2024 07:57 PM2024-04-04T19:57:51+5:302024-04-04T19:59:33+5:30
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले आहे.
अकोला : देशाचे संविधान, लोकशाही महत्त्वाची आहे. मत विभाजन व्हायला नको. वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी राहावी यासाठी काँग्रेसने शेवटपर्यंत प्रयत्न केले. अकोल्याचा उमेदवार शेवटपर्यंत जाहीर केला नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, त्यांचे उमेदवार जाहीर केले. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. पण, तुमच्या मनात शंका आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांवर सोडले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले नाना पटोले हे ४ एप्रिल रोजी दुपारी अकोल्यात स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार धीरज लिंगाडे, आमदार अमित झनक, उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या विरोधात उमेदवार उभे केले. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी उद्धवसेनेसोबत आघाडी केली होती. आमच्याकडे त्यांच्या वाटाघाटी नसतानाही प्रदेशाध्यक्ष म्हणून सकारात्मक भूमिका घेतली. दिल्लीत भूमिका मांडून वरिष्ठ नेत्यांना समजावून सांगितले. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला. पण ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कधीही भेटले नाहीत, असेही सांगितले. आंबेडकरांनी भाजपमध्ये माझे मित्र आहेत, असा आरोप केल्याचे सांगून, पटोले म्हणाले की, मैत्री आहे, पण विचारांची मैत्री आहे. असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.