- सागर कुटे
अकोला : काही दिवसांपासून शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे फुल व्यवसायाचे अर्थचक्र कोलमडले आहे. शेतमालांसह फुलबाजार ठप्प झाला आहे. खरेदीदार मिळत नसल्याने ऐन हंगामात येथील फुल बाजारात दररोज अंदाजे चार-पाच क्विंटल फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. आवक २२-२३ क्विंटलवरून १०-१२ क्विंटलवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फुल व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. सुरुवातीला चार-पाच महिने लाॅकडाऊनमध्ये फुलाला कोणी खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांनी फुले फेकून दिली होती. मध्यंतरी काही दिवस अर्थचक्राची गाडी रुळावर आल्याने फुल विक्री वाढली; परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कठोर निर्बंध लावले आहे. त्यामुळे धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, कार्यक्रम, मंदिरे बंद आहेत तर मंदिरात लागणाऱ्या फुलांची मागणीही नगण्य आहे. यामुळे फुलांची मागणी थांबली आहे. फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी आणि फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहे. बाजारात सध्या फुलांना मागणी अत्यंत कमी आहे. व्यापाऱ्यांनी प्रयत्न करूनही फुलांची विक्री होत नाही. बाजारात सकाळी विक्रीला आलेली फुले दुपारनंतर खराब होतात. सायंकाळी खराब झालेली फुले फेकून द्यावी लागत. दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी उत्पादन कमी केले आहे. तसेच आलेला माल विकण्याचा ताण आहे. सध्या जवळपास ७० टक्क्यांनी मागणी कमी झाली असल्याचे अडत दुकानदारांनी सांगितले.
हंगामातही दर मिळेना!
फुले आताचे दर मागील दर
गुलाब ३०-४० किलो १००-१५० किलो
चायनिज गुलाब ४० रु. बंडल १००-१५० रु.बंडल
लिली १० चे ५ बंडल ७०-८० चे ५ बंडल
जरबेरा १०-२० बंडल ३० बंडल
मोगरा १५-२० पाकिट ७०-८० पाकीट
निशीगंध ४०-५० किलो १००-१५० किलो
गिलाडी १० किलो ३० किलो
जरबेरा १० रु. बंडल ३० रु.बंडल
शासनाने फुलाला अत्यावश्यक सेवेत घ्यावे, फुले कच्च्या मालात मोडत असून नाशवंत आहे. सकाळी आलेली फुले सायंकाळपर्यंत खराब होतात. फळ, भाजीपाला प्रमाणे फुलांच्या विक्रीवरील बंधने दूर करावी.
प्रमोद लांजेवार, अध्यक्ष, अकोला जिल्हा फ्लॉवर असोसिएशन
कोरोनामुळे फुलांचा व्यवसाय निम्म्यापेक्षा जास्त घटला आहे. लॉकडाऊनआधी बाजारात २५-३० क्विंटल माल येत होता. निर्बंधांमुळे मागणी कमी आहे. कोरोनाची स्थिती पाहता शेतकऱ्यांनी लागवडही कमी केली आहे.
नीलेश फुलारी, अडत दुकानदार
मागील १५ वर्षांपासून फुल शेती करीत आहे. कोरोना काळाआधी ६-७ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होते; मात्र आता दर घसरले आहे. गाडी भरून बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नाही. मजुराचा खर्चही निघत नाही. त्यामुळे येत्या वर्षात फुलाऐवजी भाजीपाला लागवडीचा पर्याय निवडला आहे.
उमेश फुलारी, शेतकरी, पातूर
जिल्ह्यात फुलविक्रेता
११२
दररोजची आवक
१०-१२ क्विंटल
एवढी मागणी घटली
६०-७० टक्के