- राजरत्न सिरसाट
अकोला: कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज असून, दक्षता घेतली जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’ संचारबंदी लावण्यात आली आहे. या स्थितीत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाने बियाणे, खताचे नियोजन केले आहे. ‘लॉकडाऊन’ संपताच सर्वत्र हा पुरवठा केला जाणार आहे. राज्यात खताचे रॅक पाठविण्यात येत आहेत. मलकापूरला १,५०० मेट्रिक टन खताचा रॅक खाली करण्यात आला आहे. राज्यात येत्या खरीप हंगामात १ कोटी ३२ लाख हेक्टरचे नियोजन कृषी आयुक्तालयाने केले असून, त्यासाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयांतर्गत महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळाकडून ५ लाख २८ हजार ५०९ क्विंटल आणि राष्ट्रीय बियाणे (एनएससी) महामंडळाचे २७ हजार २६५ क्विंटल असे ५ लाख ५५ हजार ७७४ क्विंटल बियाण्यांचे हे नियोजन आहे. सद्यस्थिीत बियाणे प्रक्रिया सुरू आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये कृषी मालाच्या वाहतुकीस परवानगी आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व बियाणे बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबत कृषी आयुक्तालयातून सूचना देण्यात आल्या आहेत. बियाणे, खते वाहतुकीची परवागी असल्याने बियाणे उद्योगांजकांना बियाणे पोहोेचविण्याची मोकळीक आहे. दरम्यान, जगावर कोरोनासारखे मोठे संकट आले आहे. देशातही कोरोनाचा प्रसार वाढला आहे. तो थांबविण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहे. देशात ‘लॉकडाऊन’ आहे. अशाही परिस्थिती शेतकºयांना बियाणे मिळावे, यासाठी राज्यात बियाणे प्रक्रियांवर भर दिला जात आहे. मजुरांची या काळात टंचाई आहेच. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना बियाणे, खतांची टंचाई भासणार नाही, याकडे सध्या कृषी आयुक्तालय लक्ष ठेवून आहे. शेतकºयांना वेळेवर खते, बियाणे देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याची वाहतूक करण्यासाठी परवागी देण्यात आली आहे. मे महिन्याच्या प्रथम व दुसºया आठवड्यात शेतकºयांपर्यंत पुरवठा करण्यात येणार आहे.
- सुहास दिवसे, आयुक्त कृषी (आयएएस), पुणे.