जलकुंभी वाढली; डासांची पैदास
अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठस्थित दशेहरा नगरला जाेडणाऱ्या मुख्य नाल्याची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई न केल्यामुळे त्यामध्ये माेठ्या प्रमाणात जलकुंभी निर्माण झाली आहे. यामुळे सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याने त्यामध्ये डासांची पैदास झाली असून, इदगाहनजीक राहणाऱ्या नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
नाले सफाईकडे मनपाची पाठ
अकाेला : डाबकी राेडवरील गजानन महाराज मंदिरालगतचा नाला घाणीने तुडूंब साचला आहे. या नाल्याच्या साफसफाईकडे प्रभाग क्रमांक १० मधील भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे मनपाचे सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
भांडपुरा चाैकात ऑटाे चालकांची मनमानी
अकाेला : शहरातील ऑटाे चालकांना पाेलीस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भांडपुरा चाैकातील पाेलीस चाैकीसमाेर पाेलिसांच्या नाकावर टिच्चून ऑटाे चालक प्रवाशांसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी वाहतुकीची काेंडी निर्माण हाेत असली तरी भांडपुरा पाेलिसांकडून काेणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शेतशिवारात रानडुकरांचा हैदाेस
अकाेला : तालुक्यातील अमानतपूर ताकाेडा, खडकी, भाैरद, डाबकी, भाेड येथील शेत शिवारांमध्ये मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. मूग, उडिद, ज्वारी आदी पिकांची रानडुकरांनी नासाडी चालवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान हाेत असून, वन विभागाने रानडुकरांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.