२५ कोटींचे चुकारे : शेतकऱ्यांना प्रतीक्षा
संतोष येलकर - अकोलाहमी दराने ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर तूर खरेदी गत २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली; मात्र २० दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या तुरीचे २५ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप थकीत आहेत. त्यामुळे विकलेल्या तुरीचे चुकारे केव्हा होणार, याबाबत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने जिल्ह्यात ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर आणि अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असतानाच गत २२ एप्रिलपासून ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने मोजमाप बाकी असलेली तूर कुठे आणि कोणाला विकणार, असा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर खरेदी केद्रांवरील तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार हमी दराने खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु ‘नाफेड’द्वारे खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे गत २० दिवसांपासून थकीत आहेत. जिल्ह्यात पाचही खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत २ लाख ४५ हजार ५०० क्विंटल तूर ‘नाफेड’द्वारे खरेदी करण्यात आली. त्यापैकी गत ९ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे करण्यात आले असले तरी, १० एप्रिलपासून २२ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे २५ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप थकीत आहेत. विकलेल्या तुरीची रक्कम केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. नाफेडद्वारे तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा व बार्शीटाकळी या तीन खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत १ लाख ५८ हजार ५०० क्विंटल ८० कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी १० एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे ६० कोटी ५० लाख रुपयांचे चुकारे करण्यात आले. १० एप्रिलनंतर खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे बाकी आहेत.-मनोज वाजपेयी, जिल्हा मार्केर्टिंग अधिकारी