आगर: उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आगर येथे अवैध धंद्यांना ऊत आला असून, याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गावात खुलेआम गावठी दारू, जुगार व वरली मटका सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे युवक व्यसनाधीन होत असून, गावात भांडणांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील अवेैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
--------------------
ज्येष्ठांनी केला प्रशासकाचा सन्मान
शिर्ला: येथील ग्रामपंचायतीत नुकतेच रुजू झालेले प्रशासक यू.एल. घुले यांचा सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ आणि शहीद कैलास निमकंडे स्मारक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे आणि यांचे सहायक अक्षय गाडगे आरोग्य सेविका कडू, कमलाबाई गोपनारायण यांना ही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नारायण अंधारे होते. कार्यक्रमाचे संचालन भागवताचार्य महादेव महाराज निमकंडे यांनी तर प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष राजू कोकाटे यांनी केले.
------------------
ग्रामपंचायत निवडणूक; चर्चा रंगल्या!
आगर: आगरसह परिसरातील उगवा, खांबोरा, हातोला व लोणाग्रा येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गाव पातळीवर इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक तयारीला लागले आहेत. मतदार याद्या ग्रामपंचायत फलकावर लावण्यात आल्या असून, ८ डिसेंबर रोजी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे कुडकुडत्या थंडीत शेकोट्यांवर चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे.
---------------------
मोकाट गुरांचा हैदोस; पिकांचे नुकसान
चिखलगाव: येथील मोकाट गुरांच्या हैदोसामुळे शेतकरी वैतागले आहेत. गावाशेजारील असलेल्या शेतात रब्बी हंगामातील पिके अंकुरली आहे. मोकाट गुरे हे शेतात जात पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे संंबंधित विभागाने लक्ष देऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.