अकोला : समाजासमाजात दुही निर्माण केली जात आहे. ध्रुवीकरण केले जात आहे, तसेच गांधीजींविषयी अपप्रचार केला जात आहे. तो थांबवण्याची गरज आहे. समाजात गांधी विचारांसोबतच सद्भावना वृद्धिंगत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विदर्भ भूदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार यांनी केले. अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी जवाहर बागेत आयोजित सूतकताई यज्ञाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, श्रीकृष्ण वाघमारे केळीवेळी, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ. शि.ना. ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी १० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शिल्पास ज्येष्ठ सर्वोदयी आनंदराव गावंडे व सुमित्रा निखाडे यांनी सूतमाला अर्पण करून सूतकताई यज्ञाचा प्रारंभ केला. सकाळी ११ वाजता हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. समारोपप्रसंगी कापूस ते कापड अभियान प्रमुख प्रल्हादराव नेमाडे उरळ यांनी खादी हे वस्त्र नसून राष्ट्रनिर्माणाचा विचार असल्याचे प्रतिपादन केले.
सर्वोदय मंडळांच्या विविध उपक्रमाची माहिती बबनराव कानकिरड यांनी दिली. प्रा. मोहन खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव डॉ. मिलिंद निवाणे यांनी केले. आभारप्रदर्शन अनिल मावळे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्येष्ठ सर्वोदयी प्रा. राजाभाऊ देशमुख, आनंदराव भी. गावंडे, केशवराव काठोळे, रामचंद्र राऊत, सुमित्रा निखाडे, अंबादास वसू, गुरुचरणसिंह यदू, बार्टीचे मनीष चोटमल, उपेंद्र गावंडे, अतुल गोल्डे, बेबी नंदा दामोदर, अलका उन्हाळे, रेवती जावरकर ,कल्पना प्रकाश पळसपगार, सुनीता मुरूमकर, ललिता मुठाळ, संगीता खळेकर, महेश आढे, ॲड. वैशाली गवई, नितीन भरणे, अनिल वाघमारे, ॲड. नीलेश पाटील यांनी सूतकताई यज्ञात सहभाग घेतला. सुमीरमा फाउंडेशनच्या डॉ. पूजा खेतान, कीर्ती काळे यांनी सर्वोदय मंडळाच्या सूतकताई यज्ञास सदिच्छा भेट दिली.