अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी ८ पासून जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सुरू होणार आहे. मतमोजणीची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आली असून, मतपेटीत बंद झालेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला या मतमोजणीत होणार आहे. विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी रविवार, २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी तीनही जिल्ह्यातील २३ मतदान केंद्रांवर सरासरी ९९.0४ टक्के मतदान झाले. या मतदानात शिवसेना-भाजप युतीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रवींद्र सपकाळ या दोन्ही उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. बुधवार, ३0 डिसेंबर रोजी सकाळी ८ पासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सकाळी १0.३0 वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
आज फैसला
By admin | Published: December 30, 2015 2:12 AM