अकोला: जिल्ह्यातील २0२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. या मतमोजणीत जाहीर होणार्या निकालात निवडणूक रिंगणातील ४ हजार ८६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाच वर्षांची मुदत संपणार्या जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १५ ग्रामपंचायतींच्या अविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले असून, तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील २0२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. संततधार पावसातही जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी ६९.३७ टक्के मतदान झाले. या मतदानात २0२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील ४ हजार ३८ उमेदवार तसेच १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४८, अशा एकूण ४ हजार ८६ उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. मतदानानंतर या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजतापासून सातही तालुका स्तरावर सुरू होणार आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल दुपारी २.३0 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून, मतमोजणी तयारी सातही तालुक्यात पूर्ण करण्यात आली आहे.
४0८६ उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला
By admin | Published: August 06, 2015 1:18 AM