अकोला, दि. ५- जिल्ह्यातील २७१५ खेळाडू आणि क्रीडा रसिकांची प्रतीक्षा शुक्रवारी संपत असून लोकमत समुह आयोजित लोकमत अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलची 'दंगल' ६ ते ८ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या उदघाटनप्रसंगी होणारा 'लेझर शो', तात्या विंचू फेम सत्यजित पाध्ये यांचा 'पपेट शो', सहभागी शाळांचा 'मार्च पास्ट' हे विशेष आकर्षण ठरणार आहे.अकोला जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने लोकमत समुहातर्फे या फेस्टीव्हलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. रायफल शुटींग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बुद्धिबळ, कबड्डी, ज्यूडो, धनुर्विद्या, टेबल टेनिस, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, अँथलेटीक्स आणि कॅरम या विविध १४ खेळांचा यामध्ये समावेश आहे. १४ व १७ वर्ष वयोगटाखालील मुला मुलींमध्ये ही स्पर्धा होत असून असून जिल्ह्यातील ५६ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. सांघिक विजेतेपद पटकावणार्या शाळेला भव्य चषक देण्यात येणार आहे. विजेत्या, उपविजेत्या व तृतीय स्थानी राहिलेल्या खेळाडूंना गोल्ड, सिल्व्हर आणि बाँझ मेडलने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सांघिक क्रीडा प्रकारात १२ विजेत्या व १३ उपविजेत्या संघांना चषक देण्यात येणार आहे. ५६ शाळांतील २७१५ खेळाडूंमध्ये पदकांसाठी प्रभात किड्स डे बोर्डिंंग, वाशिम रोड, अकोला येथे ही 'दंगल' रंगणार आहे. भव्य लेझर शो आणि तात्या विंचू फेम सत्यजित पाध्ये त्यांच्या गमतीदार शैलीत बोलक्या बाहुल्यांनी मनोरंजन करणार आहेत. यासोबतच योगी डान्स ग्रुपचे कलाकार आपला नृत्याविष्कार सादर करणार आहेत. सहभागी शाळांची 'मार्च पास्ट' आणि रंगारंग कार्यक्रमाची यावेळी मेजवाणी राहणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्यांची शानदार आतिषबाजी होणार आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अरुण विधळे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अकोला स्पोर्टस फेस्टीव्हलच्या उदघाटनप्रसंगी जिल्ह्यातील क्रीडा संघटक, क्रीडा रसिक तसेच सहभागी खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आजपासून स्पोर्ट्स फेस्टिव्हलची ‘दंगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2017 2:39 AM