लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाच्या जवानांनी पाकिस्तानातून जाऊन सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याचप्रमाणे सोमवारी ४ डिसेंबर रोजी आपल्या मागण्यांसाठी जिल्हय़ातील शेतकरी भाजप सरकारविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करतील, अशी घोषणा माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी रविवारी अकोल्यात केली. शेतकरी जागर मंचातर्फे आयोजित कासोधा परिषदेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, दत्ताजी पवार, दादाराव पाथ्रीकर, काशीराम साबळे, जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, काँग्रेसचे नेते माजी मंत्री प्रा. अजहर हुसैन, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, रवी अरबट, मनोज तायडे, ज्ञानेश्वर सुलताने, विजय देशमुख, रवी पाटील अरबट, दिनकर वाघ, शेख अन्सार, सय्यद वासिफ, शेख अन्सार, दिवाकर देशमुख, टिना देशमुख आदी होते. मार्गदर्शन करताना यशवंत सिन्हा म्हणाले, भाजपने सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्यांवरील अन्याय आम्ही दूर करू व शेतमालाला हमीभाव देऊ, असे वचन दिले होते; परंतु शेतकर्यांचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला. शेतकर्यांवरील अन्याय तर दूर झालाच नाही, उलट शेतकर्यांसमोरील समस्या वाढल्या. शेतमालाची किमान आधारभूत किंमत ठरवून दिलेली आहे, असे असतानाही शेतकर्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळत नाही. सरकारला आधारभूत किमतीने शेतमालाची खरेदी करण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न करून यशवंत सिन्हा यांनी देशभरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.आता देशभरातील शेतकर्यांना आरसा दाखविण्याचे काम अकोल्यातून करायचे आहे. आर्थिक विकासाचा दर किंचित वाढला. त्याचा आनंद मोदी सरकार साजरा करते, याचेच आश्चर्य वाटते. स्वातंत्र्यापासून शेतकर्यांची लूट होत आहे. आता शेतकर्यांसाठी आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. आमच्या जवानांनी पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. तसाच सर्जिकल स्ट्राइक शेतकरी मोदी सरकारविरुद्ध अकोल्यात करतील, अशी घोषणा त्यांनी केली. कासोधा परिषदेचे प्रास्ताविक प्रशांत गावंडे यांनी तर संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.
तोपर्यंत अकोल्यातून जाणार नाही!शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अकोल्यातून जाणार नाही. शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकार्यांनासुद्धा मी सांगितले, की माझे येण्याचे रेल्वे तिकीट काढा; परंतु जाण्याचे काढू नका. शेतकर्यांना न्याय मिळाल्यावरच मी अकोल्यातून जाईल, असेही माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
आमदार, पालकमंत्र्यांमध्ये स्पर्धा - मुरूमकार अध्यक्षीय भाषण करताना, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार यांनी, भाजपचे नेते जिल्हय़ात शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहतात आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी चढाओढ करतात. येथील आमदार आणि पालकमंत्र्यांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश देण्यासाठी स्पर्धा लागत असल्याचा आरोप केला. शेतकर्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्यांचा जिल्हय़ातील एकही लोकप्रतिनिधी विचार करीत नाही. विधिमंडळामध्ये शेतकर्यांच्या समस्यांविषयी भांडताना दिसत नाहीत; परंतु श्रेय लाटायला मात्र, सर्वच चढाओढ करतात, असेही मुरूमकार यांनी सांगितले.
आंदोलनासाठी शेतकर्यांकडून निधीशेतकरी जागर मंचाच्या कासोधा परिषद व पुढील आंदोलनासाठी सर्मपण निधी संकलनासाठी सभा मंडपात टोपले ठेवण्यात आले होते. या टोपल्यांमध्ये परिषदेसाठी आलेल्या शेतकर्यांनी यथाशक्ती निधी टाकला. -