राहुल सोनोने
वाडेगाव : येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असतानाच कोसळल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शासनस्तरावरून विविध योजना राबवून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र या निधीला चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. येथे प्रशासनाच्या वतीने तीन ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. निर्गुणा नदीच्या काठावरही तीन शौचालयांचे बांधकाम सुरू होते. बांधकाम सुरू असतानाच भिंती कोसळल्याने या बांधकामादरम्यान निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप होत आहे. बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरून शासनाच्या निधीला हरताळ फासण्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------
शौचालयाचे बांधकाम सुरू असतानाच कोसळले ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी.
- चंद्रशेखर चिंचोळकर, जिल्हा परिषद सदस्य.
-----------------------------
बांधकाम परिसरात माकडांचा हैदोस सुरू आहे. सततचा पाऊस व माकडांच्या हैदोसामुळे बांधकाम कोसळले आहे. तसेच संबंधित कंत्राटदारांना पक्क्या कामाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- मंगेश तायडे, सरपंच वाडेगाव.