‘स्वच्छ भारत’अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे. अभियानच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यादरम्यान, शौचालयांच्या सेप्टिक टॅँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्याचाही अभियानात समावेश आहे. त्यासाठी शासनाने मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एफएसटीपी’ची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मैल्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असून, त्याकरिता ‘स्लज ड्राइंग बेड’ (एसडीबी) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. अहमदाबाद येथील पर्यावरण नियोजन व तंत्रज्ञान संस्थेचा अभिप्राय राज्य शासनाने घेतला असता, माफक किमतीत आणि सहज परवडणाऱ्या ‘स्लज ड्राइंग बेड’ (एसडीबी) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सुचविण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाला नागपूर येथील निरी संस्थेने मान्यता दिल्यानंतर शासनाने ‘एसटीपी’च्या उभारणीचे निर्देश दिले आहेत.
- महापालिकांना निधी वितरित
मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एफएसटीपी’च्या उभारणीसाठी राज्य शासनाने महापालिकांना निधी मंजूर केला आहे. त्यानुषंगाने महापालिकांनी प्लान्टची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.