हिवरखेड : शासनाच्या योजनांतर्गत बांधण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालये अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, या शौचालयांच्या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे. शौचालयांच्या निकृष्ट बांधकामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. नागरिकांच्या प्राणांसोबत खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. ५ जून रोजी गावातील एका महिला शौचालयातील शिटसह टाक्यात पडली होती. सुदैवाने या महिलेचे प्राण वाचविण्यात एका युवकाला यश आले.हिवरखेड ते काही वर्षांआधीच फत्तेपुरी संस्थानजवळ पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक महिला शौचालयांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यातल्या त्यात २०१६ मध्येच जवळपास पावणेदोन लाख रुपये या शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आले होते; परंतु बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे शौचालयामध्ये जाणे धोक्याचे बनले आहे. ५ जून रोजी दुपारी आशाबाई विठ्ठल डिगे ही वृद्ध महिला शौचालयात गेली असता, ती अचानक त्या शौचालयाच्या शिट आणि टाइल्ससह शौचालयाच्या टाक्यात कोसळली. ही महिला टाक्यातील घाण पाण्यात बुडत असताना, तिचा आवाज तेथून जाणाऱ्या विठ्ठल रामकृष्ण अढाऊ या युवकाला आल्याने, त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करून आशाबार्इंना घाण टाक्याच्या बाहेर काढले. त्यामुळे आशाबाई यांचे प्राण वाचले; परंतु त्या गंभीर झाल्या. त्यांचे चारशे रुपयेदेखील शौचालयाच्या टाक्यात पडले. घटनेची माहिती गावात पसरली; परंतु जखमी आशाबार्इंना दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचे साधे सौजन्यदेखील गावकऱ्यांनी दाखविले नाही. शौचालयात महिला पडण्याची ही घटना पहिली असून, यापूर्वीसुद्धा शौचालयाच्या स्लॅब कोसळून आणखी एक महिला टाक्यात पडली होती. गतवर्षी बेबीबाई बाळू पातोळे ही महिलासुद्धा शिटसह घाण टाक्यात कोसळली होती. त्यावेळी महिलांनी त्यांना वाचविले होते. शौचालयाच्या निकृष्ट बांधकामाबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर आता तरी शौचालयाचे बांधकाम करणाºया कंत्राटदारासह संबंधित अधिकाºयांवर कारवाई होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आमच्या कार्यकाळात शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. ते काम पूर्ण नियमानुसार झाले असेल. याची संपूर्ण चौकशी करूनच अभियंत्याने एमबीसीसी केली. त्यानंतरच बिल काढण्यात आले.-प्रतिभा वीरेंद्र येऊल,तत्कालीन सरपंच, हिवरखेड.शौचालयाचे निकृष्ट बांधकाम करून यात लाखो रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रारी केल्या; परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.-रवींद्र वाकोडे,ग्रामपंचायत सदस्य, हिवरखेड.