अकोला: शौचालय बांधकामाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा न होता परस्पर दुसऱ्याच्या खात्यात जमा करून लाभार्थीला माहिती नसताना काढण्यात आली. त्यातून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी, रामगाव, गोंदापूर, मुजरे मोहम्मदपूर येथील लाभार्थी शौचालयापासून वंचित आहेत. त्यांना शौचालय बांधून देण्यात यावे, तसेच चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच मंजू राहुल तायडे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.तीनही गावांतील शौचालय लाभार्थींच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर मोठा घोटाळा झाल्याचे उपसरपंच तायडे यांनी निवेदनात म्हटले आहे. लाभार्थींच्या नावावर परस्पर रक्कम काढण्यात आली. प्रत्यक्ष लाभार्थींच्या खात्यात ती रक्कम जमाच झाली नाही. दुसºयाच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. गावातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम केलेल्यांच्या यादीत लाभार्थींचे नाव आहे. त्याप्रमाणे शौचालय बांधून मिळाले नाही. त्याचवेळी ग्रामपंचायत सचिवांना लाभार्थींच्या नावे बँकेत बनावट खाते तयार केले. त्या बनावट खात्यावर परस्पर १२ हजार रुपये रक्कम टाकून काढण्यात आली. त्यामुळे गावात संबंधित लाभार्थींच्या घरी शौचालय तयार असल्याचे दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात शौचालयाचे बांधकामच झाले नाही. खºया लाभार्थींना शौचालयापासून वंचित ठेवण्यात आले, तसेच निधी हडपण्याचा प्रकार घडला. लाभार्थींना शौचालय बांधून द्यावे, चौकशी करून सरपंच, सचिवावर कारवाई करावी, अशी मागणीही उपसरपंच मंजू तायडे यांच्यासह अर्जदार राहुल तायडे यांनी केली आहे.