अकोला : राज्यभरातील सर्वच शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेहमीसाठी ‘हिपॅटायटिस’च्या रुग्णांची मोफत तपासणी व लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासोबतच रुग्णांसाठी १८००११६६६६ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर रुग्णांना हिपॅटायटिस आजाराविषयी संपूर्ण माहिती व त्यावर आवश्यक उपचारासंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त रविवार, २८ जुलै रोजी हिपॅटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले. यांतर्गत सर्वच जिल्हा रुग्णालयांत मोफत हिपॅटायटिस तपासणी आणि उपचार सेवा देण्यात येणार आहे. तसेच हिपॅटायटिसबद्दल अधिकृत माहिती व रुग्णांना मदत व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांतर्गत १८००-११-६६६६ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून, रविवार, २८ जुलैपासून सर्वत्र कार्यान्वित करण्यात आला आहे.‘हिपॅटायटिस’च्या रुग्णांना कर्करोगाचा धोकाभारतात सुमारे चार कोटी ‘हिपॅटायटिस बी’ तर जवळपास ६० लाख ते १.२ कोटी ‘हिपॅटायटिस सी’चे रुग्ण असल्याचा अंदाज आहे. या रुग्णांना यकृत संबंधित आजार व कर्करोग होण्याचा मोठा धोका संभवतो. राज्यात हिपॅटायटिसच्या उपचारासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे.२०१५ पर्यंत हिपॅटायटिस निर्मूलनाचे ध्येयमहाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोफत निदान, उपचार आणि औषध, असा हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, उर्वरित सर्व राज्यांमध्ये लवकरच ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. हिपॅटायटिसचा समूळ उपचार करून हे लक्ष्य २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आरोग्य विभागाचा आहे.
राज्यात झालेल्या हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देश ‘हिपॅटायटिस’मुक्त करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असून, महाराष्ट्र शासनाने यासाठी पुढाकार घेतला आहे. आजाराविषयी अधिक जनजागृती व्हावी, तसेच रुग्णांना यासंदर्भात आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.